गोठ्यात घुसून बिबट्याने ३ शेळ्या केल्या फस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त आढळून आला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर हल्ले वाढले आहे.

यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी अजमपूर येथे लक्ष्मण गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने सात शेळ्यांवर हल्ला केला.

तीन शेळ्या त्याने फस्त केल्या. अन्य ३ शेळ्या जखमी झाल्या. एका शेळीला घेऊन बिबट्याने पलायन केले. बिबट्याने पाण्याच्या टाकीचा आधार घेत गोठ्यात प्रवेश करत शेळ्यांवर हल्ला केला.

मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपाल उपासनी, एस. बी. सोनवणे, चौधरी, डॉ. शिदे आदींनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बिबट्याच्या दहशतीने नागरिक धास्तावले असून पिंजरा लावावा, अशी मागणी गिते परिवाराने केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24