विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकविला धडा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी : पहिल्यांचा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा, हातजोडुन विनंती, अन्य गांधीगिरी मार्गाचा अवलंब करूनही शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेत

विनाकारण दुचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना पकडून थेट रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयात पाठविले. या अनोख्या कारवाईचा आता मोकाट फिरणाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. कोरोना जंतु संसर्ग वाढू नये यासाठी शासन व प्रशासन विशेष उपाय योजना राबवत खबरदारी घेत आहे.

लॉकडाऊन असल्याने अनावश्यक घराबाहेर पडू नये असे वारंवार सांगण्यात आले. मात्र, तरीही काही चाकरमाने अत्यावश्यक कामाच्या नावाखाली दुचाकीवर किंवा पायी रस्त्यावर फिरताना दिसतात.

शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने अशा फिरणाऱ्यांना काठीचा चांगलाच प्रसाद दिला, दुचाकी जप्त करुन दंड आकारणी केली, भररस्त्यात उठाबशा काढावयास लावल्या, काही प्रमाणात या कारवाईमुळे आळा बसला असला

तरी काहीजण मात्र विनाकारण फिरत असल्याने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी वाहतूक शाखेचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, वाहतूक पोलीस, शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, मुख्य हवालदार सूर्यवंशी, फड, दरदंले आदींसह कर्मचाऱ्यांनी विशेष मोहिम हाती घेत

द्वारका सर्कलवर विनाकारण दुचाकीवर व पायी फिरणाऱ्यांवर कारवाई केली. दुचाकीस्वारांच्या गाड्या ताब्यात घेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत रुग्णवाहिकेतून थेट साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तपासणीसाठी रवाना केले. तीनतास ही कारवाई मोहीम राबविण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24