Ahmednagar News : भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. भोजापूरच्या पाण्याचा विसर्ग तळेगावकडे मार्गस्थ झाला असून हे पाणी काल गुरुवारी तालुक्यातील पिंपळे गावापर्यंत पोहोचले आहे.
त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून शेवटच्या गावापर्यंत पाणी मिळेपर्यंत काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्यामुळे या कामाला चांगलीच गती आली.
गेली अनेक वर्षे भोजापूर पाण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी लढा देत आहे. निळवंडे लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या गावातील शेतकऱ्यांना भोजापूर धरणाच्या पाण्याचा लाभ मिळावा ही अपेक्षा होती.
पण गेली अनेक वर्ष याबाबत निर्णय झाले नसल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहात होते. यंदा धरण भरले तरी पाणी मिळू शकत नाही ही बाब सहन करून शकलेले शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी याची गंभीर दखल घेवून यासंदर्भात बैठका घेवून चारीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.
भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रशासनाने मागील तीन चार दिवसात रात्र दिवस जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदाईचे काम करून पाण्याच्या वहनातील सर्व अडथळे दूर केल्याने पाणी काल पिंपळ्या पर्यंत पोहचले.
आता तळेगावकडे पाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनी गुलाल उधळून केला. निळवंडे कालव्या प्रमाणे भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यानांही युती सरकारमुळे दिलासा मिळाला आहे.
निळवंडे पासून वंचित राहीलेल्या गावांना आता भोजापूर धरणातील हक्काचे पाणी मिळाल्याने राजेंद्र सानप, नवनाथ महाराज गडाख, पांडुरंग फड, शिवनाथ चतर, किसनराव चतर, सोपान गिते, कचरू गिते, माधव महाराज, सतीष गीते, बबन घुगे, रंगनाथ पवार, अनिकेत गिते आदीनी समाधान व्यक्त केले आहे.