अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- राहुरी शहरातील चंद्रशेखर आझाद चौकात ३० फूट जागेत भव्य सिंहगड किल्ला साकारण्यात आला आहे. राहुरीतील मावळे ग्रुप या तरुणांच्या उपक्रमशील ग्रुपचा एक आगळा-वेगळा दिवाळी सणानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची तालुक्यात मोठी चर्चा होती.
दिवाळी सणाच्या निमित्ताने आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना, महापुरुष, गड – किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून हा उप्रक्रम साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दिवाळी सणानिमित्त अनेक ठिकाणी लहान मुलापासून मोठ्या मंडळींपर्यंत हौशी नागरिकांकडून विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जातात. राहुरी शहरात गेल्या तीन ते चार वर्षापासून दिवाळीत लहान मुले इमारतीच्या गच्चीवर, टेरेसवर, चौकातल्या मोकळ्या जागेत, गल्लीत, छोटे-छोटे किल्ले तयार करतात.
असाच एक उपक्रम राहुरी शहरातील मावळे ग्रुपमधील युवकांनी केला असून या ग्रुपने आझाद चौकातील एका मोकळ्या जागेत शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या कोंढाणा अर्थात सिंहगड या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती आकृती साकारण्यात आली.
या किल्ल्याच्या प्रतिकृतीत छोटे-छोटे मावळे , भवानी टोक, बालेकिल्ला, तोफा आदी अगदी हुबेहूब साकारण्यात आले आहेत. राहुरीकरांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे .