संविधान बदलण्याचा महाविकास आघाडीचा दावा म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्तव्य केली जात असल्याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्टे यांनी केला.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेवून महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
आपली भूमीका विषद करताना प्रा.मच्छिंद्र सक्टे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने आमच्या मागणी प्रमाणे आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे करण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. तसेच घाटकोपर येथील त्यांचे निवास्थान राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी सुध्दा ३०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचा शासन आदेश जारी केला आहे.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाची तसेच समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याची मागणीही महायुती सरकारनेच पुर्ण केल्यामुळे लोकसभा निवडणूकीत महायुतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीने संविधान बदलाचा विषय खोडसाळपणे पुढे आणला आहे असा आरोप करुन, प्रा.सक्टे यांनी सांगितले की, संविधानात बदल करता येईल परंतू ते रद्द करता येणार नाही. घटनेचा गाभा कोणालाही बदलता येणार नाही ही भूमिका स्पष्ट असताना सुध्दा केवळ समाजाची दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होत आहे.
यावर सामान्य जनता विश्वास ठेवणार नाही. कारण सर्व दलित नेते महायुती सोबत आहेत. पवार आणि ठाकरेंवर आता विश्वास राहीलेला नाही. त्यामुळेच दलित महासंघ आणि मातंग समाजाचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबरीपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी संजय चांदणे, अरुणा कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.