अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-न्यायालयीन प्रक्रियेत असलेला व्यवहाराचा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करुन सोडवावा यासाठी खांडगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाने पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती.
दरम्यान या वृध्दाचा लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात काल दुपारी उपचार सुरु असतांना मृत्यु झाला. अनिल शिवाजी कदम (वय 73 रा. खांडगाव) असे या वृध्दाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भाडेकरी सादिक शेख व सुमैय्या शेख हे आपल्याला फार त्रास देत असल्याचे अनिल कदम यांनी दिनांक 10 जानेवारी रोजी सर्व संबंधित अधिकार्यांना व पदाधिकार्यांना निवेदन पाठविले होते.
त्यांच्यावर कारवाई करुन मला न्याय द्यावा अन्यथा आपण प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करु असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला होता.
निवेदन देवूनही प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने अखेर प्रजासत्ताक दिनी कदम यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.
या आगीत सदर वृध्द गंभीररित्या भाजले होते. उपचारासाठी त्यांना त्वरीत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यु झाला.
प्रशासनाच्या अधिकारी, पदाधिकार्यांना अन्यायाची कल्पना देवूनही कोणीच गांभीर्य घेतले नाही. अखेर न्याय मिळवता मिळवताच वृध्दाला आपला जीव गमवावा लागला.