अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानाकडे जात असलेला धडक मोर्चा पोलीस प्रशासनानेच मोडीत काढला.
यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. आज दुपारी दोन वाजेदरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वंचित बहुजन आघाडी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
तनपुरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला मोर्चा नवीपेठेत आला असता, पोलीस प्रशासनासाने मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती.
महावितरणकडून घरगुती ग्राहकांना आलेले अवास्तव वीजबिल दुरुस्त करून ते 50 टक्के माफ करण्यात यावे, केंद्र शासनाने पारीत केलेले शेती बिल, एनआरसी व सीएए कायदे महाराष्ट्रात लागू करू नये, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेसाठी लाभार्थ्यांची उत्पन्नाची व मुले सधन होण्याची अट रद्द करून सर्व लाभार्थ्यांचे 4 ते 5 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे त्वरीत द्यावेत.
खावटी योजनेअंतर्गत आदिवासींना लावलेल्या अनेक जाचक अटी रद्द करून सरसकट खावटी योजना लागू करावी, बारागाव नांदूर येथील मच्छिमारी सहकारी संस्थेचे पुनरुज्जीवन करून मुळा धरणातील मच्छिमारीचा ठेका या संस्थेला देण्यात यावा, ज्या आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींच्या ताब्यात आहेत, त्या संबंधितांना देण्यात याव्यात.
तसेच राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाची अद्ययावत इमारत बांधकाम लवकरात लवकर करून ती जनतेसाठी खुली करण्यात यावी, या मागण्यांसाठी मंत्री तनपुरे यांच्या निवासस्थावर हा मोर्चा नेण्यात येणार होता.