आमदार लहामटे झाले एक दिवसाचे विधानसभा अध्यक्ष … ! अकोलेत आनंदोत्सव

Pragati
Published:

Ahmednagar News : आमदार डॉ. किरण लहामटे यांना पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज करण्याची संधी मिळाली. इतिहासात पहिल्यांदाच अहमदनगर जिल्ह्याचा प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यामुळे अकोले तालुक्यात फटाक्याची अतिषबाजी करुन पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे, काही कारणास्तव अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही नसल्याने आमदार डॉ. लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचे कामकाज झाले. एक दिवसासाठी का होईना पण विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसून तात्पुरते अध्यक्ष म्हणून कामकाज करण्याची संधी डॉ. लहामटे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याला मिळाली आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष निवड झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून कामकाज पाहिल्यानंतर अकोलेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे प्रभात चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात जल्लोष साजरा करत एकमेकांना पेढे भरविण्यात आले.

यावेळी चौधरी म्हणाले, इतिहासात आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्याचा प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर पहिल्यांदा बसलेला आहे. त्यामुळे हा आनंदाचा दिवस आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी २०१९ च्या परिवर्तनानंतर तालुक्यात विकासासाठी उच्चांकी निधी आणून पहिला विक्रम केला होता. आता पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत जिल्ह्यात विक्रम केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासी भागातील नेत्याला म्हणजेच आ. डॉ. लहामटे यांना संधी दिली याबद्दल या सर्वाचे आभार व तालिका अध्यक्ष म्हणून निवड झालेले आ. डॉ. लहामटे यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत अकोले तालुक्याला सन्मान मिळवून दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे फटाक्याची अतिषबाजी करुन पेढे वाटत करण्यात आले. याप्रसंगी पियुष पंजाबी, प्रतिश देशमुख, प्रविण वाकचौरे, आनंद देशमुख, प्रथमेश सहाणे, श्रीकांत वालतुले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe