Ahmednagar News : सह्याद्रीच्या पर्वतरांगातून समुद्रात वाहून जाणारे पाणी हरिश्चंद्रगड परिसरातून मुळा धरणात वळवल्यास या वाढीव पाण्याचा उपयोग पाथर्डी तालुक्यातील चिचोंडीसह इतर सोळा गावांना निश्चितपणे होईल,
यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून या प्रश्नासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजवावी, भावना माजी सभापती संभाजी पालवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
वांबोरी चारी टप्पा एकमधून तेरा गावांना पाणी सोडणे, टप्पा एक व टप्पा दोन अशा दोन वेगवेगळ्या योजना मंजूर झालेल्या आहेत. वांबोरी चारी टप्पा एक २००८ पासून कायर्यान्वित असून, त्यामध्ये जवळपास १०२ पाझर तलाव भरण्याचे शासनाचे नियोजन आहे; परंतु जवळपास १७ तलावांमध्ये अद्यापपर्यंत या योजनेचे पाणी कधीही पोहचलेलं नाही, ते पाणी जवळपास ६० एमसीएटी शिल्लक राहते.
वांबोरी चारी टप्पा दोनचे आता प्रत्यक्ष टेंडर होण्याच्या मार्गावर असून, एक दोन महिन्यात टेंडर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायम दुष्काळी समजला जातो. मुळा धरण होत असताना पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला लाभ होईल असे गृहीत धरले होते; परंतु प्रत्यक्षात आठ दहा गावांनाच त्याचा फायदा झाला; इतर गावे वंचित राहिली.
१९८०/८२ पासून वांबोरी चारीसाठी मागणी व आंदोलन सुरू झाले. लोकप्रतिनिधींवर जनतेचा दबाव वाढल्याने शासनाला त्याची दखल घ्यावी लागली. युतीच्या काळात वांबोरी चारीऐवजी पाईप चारीला मंजुरी मिळाली. आता भागाला न्याय मिळेल असं वाटलं होतं; परंतु प्रत्यक्षात मोजक्याच गावांना याचा फायदा झाला.
२००७ पासून मी व स्व. मोहनराव पालवे यांनी वांबोरी चारीच्या पाण्यापासून जी गावे वंचित राहिली होती त्याकरता सातत्याने लढा उभारला, शासन दरबारी पाठपुरावा केला, ती योजना प्रत्यक्षात थोड्या दिवसांत कार्यरत होणार आहे. टप्पा १ व टप्पा २ यामधून वंचित राहिलेली जवळपास १४ गावे असून, त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे, अशी या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे.
शासकीय स्तरावर आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून आणि हरिश्चंद्रगडावरून जे पाणी कोकणात वाहून जाते, ते पाणी आता मुळा धरणामध्ये वळवण्याचे शासकीय नियोजन चालू आहे. पाथडींच्या पश्चिम भागातील दुष्काळी गावांना हे पाणी वांबोरी टप्पा एकमधून देता येणे शक्य आहे.
फक्त याकरिता हवी आहे. राजकीय मानसिकता. राजकीय जोडे बाजूला ठेवून काम केल्यास भागाला कायमचं हक्काचं पाणी मिळू शकते, असा विश्वास माजी सभापती संभाजी पालवे यांनी व्यक्त केला आहे. अवघ्या सहा कोटी खर्चात हे पाणी १३/१४ गावांना देणे शक्य आहे. यासाठी लो कप्रतिनिधींसहजनतेला आपली ताकद उभी करावी लागणार असल्याचे पालवे यांनी सांगितले.
या गावांना मिळू शकतो लाभ
वांबोरी चारी टप्पा एकमधून चिचोंडी, कडगाव, धारवाडी, राघूहिवरे, लोहसर खांडगाव, मोहोजबुद्रुक, मोहोजखुर्द, मांडवे, त्रिभुवनवाडी, निबोडी, आणि देवराई या सर्व गावांना हे पाणी देणे शक्य यासाठी १६० ते १७० एमसीएफटी पाणी लागतं आणि खर्च सहा कोटीच्या आसपास येवू शकतो.
यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी मुळा धरणात वळवून वळवलेले पाणी वांबोरी चारीच्या माध्यमातून या गावांना देणे शक्य आहे.- संभाजी पालवे, माजी सभापती