अहमदनगर बातम्या

जिल्ह्यातील या महत्वाच्या रेल्वे मार्गाकडे केंद्राचे दुर्लक्ष; ग्रामस्थांमध्ये नाराजी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  संसदेत नुकत्याच सादर केलेल्या अंदाजपत्रकात पुणतांबा-रोटेगाव या नियोजित रेल्वे मार्गाकडे कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. या रेल्वे मार्गाकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

केंद्राच्या या धोरणामुळे पुणतांबेकरांचा अपेक्षा भंग होऊन परिसरात तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस सेलचे उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

दरम्यान पुणतांबा-रोटेगाव हा अंदाजे 25 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग व्हावा ही पुणतांबा परिसराची गेल्या 25 वर्षापासूनची मागणी आहे.

माजी रेल्वेमंत्री नितीश कुमार हे पुणतांबा-शिर्डी रेल्वे मार्गाच्या भूमिपूजनाला आले असता त्यांनी या रेल्वे मार्गाला तांत्रिक मंजुरी दिल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण सुद्धा झाले होते. मात्र नंतर या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मागे पडला .पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्ग दक्षिणेकडील राज्यातील भाविकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त होता.

भाविकांना शिर्डीला अत्यंत कमी वेळेत जाणे शक्य होणार होते. तसेच वेळ व पैशाची बचत होणार होती. पुणतांबा परिसर व गोदावरी नदीकाठच्या गावाच्या विकासाला मदत होणार होती.

मात्र देशाच्या अर्थसंकल्पात तसेच रेल्वेच्या अंदाजपत्रकातही या रेल्वेमार्गाला स्थान मिळत नसल्यामुळे भविष्यात हा रेल्वेमार्ग होईल की नाही? याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office