अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-नवीन वर्षानिमित्त हजारो साईभक्तांनी साईंदरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. दरवर्षीप्रमाणे साई संस्थानने 31 डिसेंबरच्या रात्री मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये उपस्थिती लावली होती. अनेक भाविकांना पासेस उपलब्ध न झाल्याने त्यांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले.
नववर्षाच्या स्वागतासाठी साईंच्या शिर्डीत अलोट गर्दी होऊनही सर्वांचे आनंदात दर्शन झाले. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटी यांची काटेकोरपणे यावेळी अंमलबजावणी करण्यात आली.
साई समाधी दर्शनासाठी एकच प्रवेशद्वार तसेच बाहेर येण्यासाठी योग्य नियोजन केल्याने गोंधळ झाला नाही. बायोमेट्रिक पासेसची सक्ती असल्याने भाविकांना रांगेत व
शिस्तबद्ध वातावरणात दर्शनाचा लाभ घेता आला. विशेष म्हणजे, हजारो पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे कोणतीही चोरीची, पाकीटमारीची घटना घडली नाही.