तहान भागवणाऱ्या टँकरची संख्या झाली १४६

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या चढत्या पाऱ्याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. सात एप्रिलच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावस्त्यावरील ३ लाख ५ हजार ८६६ इतक्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४६ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पाऱ्यामुळे पाणीसाठ्यांचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या गावांची आणि वाड्याची संख्या एप्रिल येता-येता लक्षणीय वाढली.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असतानाच दुसरीकडे दैनंदिन कामकाज आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.

स्थानिक पातळीवरील यंत्रणेने टंचाई परिस्थितीवर गांभीर्याने काम करावे, आवश्यकतेनुसार पिण्याचे पाण्याचा पुरवठा करावा, टँकरचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या १०० झाली होती.

आता दि.७ एप्रिलच्या अहवालानुसार जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावर त्यावरील तब्बल तीन लाख ५ हजार ८६६ इतक्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या १४६ टँकरची धावाधाव सुरू आहे.

दरम्यान, उपलब्ध असलेले पाणी काळजीपूर्वक वापरावे. पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe