Ahmednagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथील श्रीराम मंदिरात एकट्या प्रभू श्रीरामांची मूर्ती असून पाचशे वर्षाची परंपरा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. इतर मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या मुर्तीसोबत सीतामाई यांची मूर्ती आढळते.
परंतु जेऊर येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची एकटी मूर्ती आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गावागावांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जेऊर येथील श्रीराम मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली. संपूर्ण नगर तालुका प्रभू श्रीरामचंद्रांच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले.
श्रीराम नामाचा गजर, भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, हनुमान चालीसा, फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर अन्महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण नगर तालुका ढवळून निघाला होता.
तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राम मंदिर आणि हनुमान मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अबालवृद्ध भक्ती रसात बुडाले होते.
जेऊर येथील श्रीराम मंदिराला पाचशे वर्षांची परंपरा आहे. तसेच श्रीरामांची एकटी मूर्ती असलेली हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. ज्यावेळी पंचवटीतून सीतेला पळवून नेण्यात आले. त्यावेळी तिच्या शोधात राम आणि लक्ष्मण दक्षिणेला दंडकारण्यात आले असता दुपारच्या वेळी विश्रांतीसाठी सद्यस्थितीतील जेऊर येथील राममंदिर परिसरात थांबले होते.
लक्ष्मण फळांच्या शोधार्थ परिसरातील दंडकारण्यात गेले होते. सदर मंदिराची पूजा सेवा करण्याचे काम प्रकाश शास्त्री ढेपे हे परंपरेने करत आहेत. प्रकाश शास्त्री ढेपे यांची ही श्रीराम मंदिराची सेवा करण्याची आठवी पिढी आहे.
जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, निंबळक, देहरे, चास, अकोळनेर या गावांबरोबर परिस्रातील गावांनी मोठा जल्लोष करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भगव्यामय वातावरणात महिला, अबाल वृद्ध रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले.
बहुतेक गावांनी मांसाहार, दारूबंदी करण्यात आली होती. गावागावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामांची मिरवणूक काढण्यात आली होती. पक्ष, गट- तट बाजूला ठेवून स्थानिक नागरिक आनंदोत्सव सोहळा साजरा करताना दिसून आले.
जेऊर तसेच वाळकी येथील श्रीराम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नामजप, पूजा, कीर्तन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सव सोहळा ही विविध गावांनी पहावयास मिळाला.