अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शालेय साहित्यासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने मालकानेच लावली आग !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शालेय साहित्याच्या गोदामासाठी दिलेली जागा रिकामी न केल्याने गोदामाला चक्क आग लावून देण्याचे कृत्य जागामालकाच्या पुतण्याने केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी स्टेशनरी दुकानदाराने कोपरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विशाल विजय नानकर यांचे कोहिनूर बुक स्टॉल नावाचे दुकान आहे. दुकानासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी कहार गल्ली येथे विक्रम मधुकर मेहरे (रा. कोकमठाण) यांच्या चुलत्याचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले आहे.

शहराच्या मध्यवर्ती असलेले हे गोदाम रिकामे करून देण्यासाठी मेहरे हे नानकरकडे तगादा लावत होते. परंतु, नानकर यांनी गोदाम रिकामे करून देण्यास असमर्थता दर्शविली होती. त्याचा राग येऊन विक्रम मेहरे यांनी सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गोदामाला चक्क आग लावून दिली. या आगीत शालेय साहित्य वह्या, पुस्तके, छत्र्या, नोटीस बोर्ड व इतर स्टेशनरी जळून खाक झाली होती.

आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या बंबाला दोन तास लागले होते. घटनेनंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. एक दिवसानंतर नानकर यांनी कोपरगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित विक्रम मधुकर मेहरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस बी. एच. दाते हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office