बस ‘बंद’ केल्यामुळे प्रवाशांचे हाल ! नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनेकवर्षापासून नगरहून कान्हूरपठार मार्गे जवळा (ता. पारनेर) येथे मुक्कामी येणारी एसटी बस पारनेर आगाराच्या प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक बंद केल्याने शिक्षणासाठी तसेच कामधंद्यासाठी नगरला जाणाऱ्या येणारे विद्यार्थी, महिला प्रवासी व पासधारकांची मोठी गैरसोय झाली

जवळा (ता. पारनेर) येथून ही बस सकाळी सुटते, पाडळी दर्या मार्गे कान्हूरपठार, गोरेगाव, पाडळी फाटा, हिवरे कोरडा, माळकुप, भाळवणी मार्गे नगरला जाते. यात बहुतांशी नगरला जाणारे विद्यार्थीच असतात.

अनेक वर्षापासून या मार्गावरील प्रवाशांची या बसमुळे सकाळी लवकर नगरला जाण्यासाठी मोठी सोय होत होती तसेच संध्याकाळी ही बस नगरमधून सुटत असल्याने नगरमधील दिवसभराचे कामकाज आटोपून संध्याकाळी आपल्या घरी जाण्यासाठी ही बस सोयीची होती. विशेषतः महिला प्रवासी व विद्यार्थिनींची या बसमुळे चांगली सोय होत होती

बस बंद केल्याने त्यांचे व इतर सर्व प्रवाशांचे हाल होत आहेत, ही बस बंद झाल्याने प्रवाशांना इतर मार्गाचा अवलंब करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पारनेर आगाराने यापूर्वीही ही बस बंद केली होती; परंतु प्रवाशांच्या रेट्याने आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पुन्हा चालू केली होती.

बस सुरू करण्यासाठी फोन केला तर उडवाउडविची उत्तरे दिली जातात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. पारनेर डेपोने लवकरात लवकर ही बस चालू करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पारनेर आगार प्रशासनास निवेदन दिले देऊन बस पुन्हा लवकर सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ व प्रवाशांनी दिला आहे.

या मार्गावर बसचे उत्पन्न कमी मिळत असल्याने ही बस बंद केल्याचे पारनेर आगाराचे प्रमुख योगेश लिंगायते यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर ही बस पुन्हा पूर्ववत सुरू करणार असल्याचे लिंगायते यांनी सांगितले.