अहमदनगर बातम्या

वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्काळ पावले उचलावी : डॉ. पिपाडा

Published by
Ahmednagarlive24 Office

शिर्डी आणि परिसर गुन्हेगारीचा अड्डा झालेला असून चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. यामध्ये दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोऱ्यासह साई भक्तांकडील दागिन्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष देवुन चोऱ्या व गुन्हेगारी कमी करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना नुकतेच दिले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी व परिसरामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या वाढल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना भेटण्यास आलेल्या नातेवाईकांच्या दुचाकी श्री साईनाथ हॉस्पिटल जवळुन चोरीस जाण्याच्या शेकडो घटना घडल्या आहे. सामान्य माणसासाठी दुचाकी मोलाची गोष्ट आहे.

चारचाकी वाहनांच्याही शिर्डी, राहाता व परिसरात चोऱ्याही वाढल्या असून या सर्व गोष्टींना कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे. माझ्या घरासमोरुन दोन दुचाकी चोरीस गेल्या आहेत. गेल्या २ वर्षात नगर जिल्ह्यात साडेचार हजार वाहने चोरीस गेल्याच्या घटना झालेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त वाहने चोरीस गेली आहेत.

शिर्डी येथे महिलांचे गंठण, सोनसाखळी चोरीसारखे मोठ्या प्रमाणावर होवुनही फिर्यादी घेण्यास टाळाटाळ केली जाते. शिर्डी सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि महिलांचे गंठण चोरी वाढलेली असून भक्तांना शिर्डीमध्ये असुरक्षित वातावरण आहे. त्यामुळे ही गुन्हेगारी तात्काळ थांबणे गरजेचे आहे.

जिल्ह्यामध्ये सुमारे साडेचार हजार दुचाकी चोरी झाल्याची बातमी नुकतीच माध्यमांमधून प्रसिद्धही झाली होती. प्रत्यक्षात हा आकडा १० हजार पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर महिलांचे सोन्याचे दागिने चोरीसह सोनसाखळी चोरीच्या स्वरूपाचे गुन्हेही सातत्याने घडत आहेत.

पोलीस प्रशासन मात्र गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. फिर्याद नोंदवून न घेणे, फिर्याद नोंदवण्यासाठी आलेल्या नागरीकांनाच दमदाटी करणे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तातडीने तपास न करणे, असे प्रकार सऱ्हासपणे सुरू आहेत.

त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून नागरीक पोलीस प्रशासनावर प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून सदर गुन्ह्यांवर नियंत्रण आणावे. तसेच दाखल गुन्ह्यांचा तपासही तातडीने व्हावा, यासाठी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले.

Ahmednagarlive24 Office