अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-तालुकूयातील निंबळक येथे मंगळवार (दि.9 फेब्रुवारी) सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. निंबळकच्या सरपंचपदी प्रियंका अजय लामखडे यांची सतरा पैकी अकरा मतांनी निवडून आल्या.
तर उपसरपंचपदी बाळासाहेब जगन्नाथ कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. निंबळक गावात पुन्हा सरपंच पदाची धूरा महिलेच्या खांद्यावर आली असून, लामखडे परिवारातील चौथी पिढी ग्रामपंचायत पदाचे प्रतिनिधत्व करणार आहे.
दुपारी 2 वाजता सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निंबळक ग्रामपंचायतीत पार पडली. ग्रामपंचायत सदस्यांनी गुप्त पध्दतीने बॅलेटपेपरद्वारे मतदान केले. सरपंच पदासाठी प्रियंका लामखडे व राजेंद्र कोतकर यांनी अर्ज दाखल केला होता.
यामध्ये प्रियंका लामखडे यांना 11 तर राजेंद्र कोतकर यांना 6 मते पडली. यामध्ये प्रियंका लामखडे यांचा 5 मतांनी विजय झाला. उपसरपंचपदासाठी बाळासाहेब कोतकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
सदर निवडणुकीची प्रक्रिया निवडणुक निर्णय अधिकारी नालेगाव सर्कल राजू आंधळे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, तलाठी साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सरपंच व उपसरपंच पदाची निवड होताच समर्थक कार्यकर्त्यांसह महिलांनी ग्रामपंचायतच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.