अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नगरच्या शासकीय विश्रागृहावर आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेत अध्यक्षांनी पालकमंत्र्यासमोर अडचणीचा पाढाच वाचला.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांचे पगार थकले असून वाहने दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या रुग्णवाहीका चालकांअभावी उभा आहेत.
यासह जिल्हा परिषदेत असणार्या अडचणीची माहिती अध्यक्षा राजश्री घुले यांनी पालकमंत्र्याना दिली. यावेळी अध्यक्षा राजश्री घुले, आ. रोहित पवार, आ. संग्राम जगताप, आ. डॉ. किरण लहामटे,
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, काँग्रेस पक्षाचे गटनेते अजय फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आणि खाते प्रमुख उपस्थित होते.
स्वतंत्रदिनाच्या पूर्व संध्येला अध्यक्षा घुले यांनी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या विविध प्रश्न आणि मागण्या सादर केल्या. या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात चर्चा झाली.
यावेळी आरोग्य विभागातील अडचणी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. जि.प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून ते तातडीने भरणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री यांना सांगण्यात आले.
तसेच 108 क्रमांकांची रुग्णवाहीकांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोल्या व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
हा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी भरीव निधी मिळावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अडीअडचणी ना. राजेश टोपे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून
आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत मंत्रालयस्तारवर बैठक घेण्याचा निर्णय घेतला. तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी पालकमंत्री यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून सुचना केल्या.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved