राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (दि.३०) अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच एक राष्ट्रपती शनी शिंगणापूर याठिकाणी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
या दोन तीन तासात अनेकांना त्रासही झाला, दुकाने बंद राहिली. परंतु देशाच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणार्थ या गोष्टी करणे योग्यच होते असे म्हणावे लागेल. राष्ट्रपतींच्या या तीन तासाच्या दौऱ्यात काय काय झालं पाहुयात –
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झापवाडी हेलिपॅडवर उतरल्या. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या हेलिपॅडपासून मंदिरापर्यंत १०६५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. ते येण्याआधीच एक तास आधीपासून दीड वाजेपर्यंत मंदिरात सर्वसामान्य भक्तांसाठी शनिदर्शन बंद केले होते. त्याचप्रमाणे वाहतूक थांबवणेही अनिवार्य होते. त्यामुळे घोडेगावपासून मंदिरापर्यंतची वाहतूक तब्बल दीड तास बंद ठेवली. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. स्थानिकांसह परराज्यातून आलेल्या शनिभक्तांना महामार्गावर रस्त्याच्या कडेला व पार्किंगमध्येच थांबावे लागले होते. सकाळी मंदिर परिसरात आलेल्या भाविकांना राष्ट्रपती जाईपर्यंत पार्किंगमध्ये ताटकळावे लागले. हेलिपॅडवरून राष्ट्रपती पुण्याकडे रवाना झाल्यानंतर दीड वाजता दर्शन सुरू झाले.
११.३० वाजता आगमन:- राष्ट्रपतींचे सकाळी ११.३० वाजता हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांना येण्याआधीच एक तास अगोदर मंदिर रिकामे करण्यात आले. सकाळी १०.३० ते १.३० वाजेपर्यंत निमंत्रित अतिथी वगळता इतरांना प्रवेश नाकारण्यात आला. बहुतांश अधिकारी, कर्मचारीही मंदिराबाहेरच होते. पावणेबारा वाजता ६३ वाहनांचा ताफा राष्ट्रपतींना घेऊन मंदिरात दाखल झाला. तेव्हापासून दीड तास मंदिर मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. दुपारी १२.१० वा. महापूजा व अभिषेक दुपारी १२.२५ ला त्यांनी श्री शनिदेवास तैलाभिषेक केला. दुपारी १२.४० ला महाप्रसाद आयोजना संपन्नकरून जेवण करून दुपारी १.१६ हेलिपॅडकडे निघाल्या होत्या. जवळपास त्या दिड तास मंदिरात होत्या.
परिसरातील दुकाने, पूजा साहित्याचे शॉप, हॉटेल्सवाल्यांची तारांबळ :- या दौऱ्यानिमित्ताने शनिशिंगणापूर येथे मंदीर परिसरात असलेली सर्व पूजा साहित्याची, तेल विक्रीची दुकाने सकाळी १० पासूनच बंद ठेवली होती. त्याचप्रमाणे याठिकाणी असणारी हॉटेल्स देखील बंद ठेवण्यात आली. सुरक्षेच्या हिशोबाने हे केले गेले. परंतु यामुळे पार्किंगमध्ये ताटकळलेल्या शनिभक्तांची गैरसोय झाली.
दिल्लीतील अधिकाऱ्यांची ‘ती’ एक कृती अन सगळेच भारावले :-राष्ट्रपती यांचा दौरा झाला, पण या दौऱ्यात दिल्ली अधिकाऱ्यांची एक कृती सर्वानाच भावली. शनि अभिषेक झाल्यावर राष्ट्रपती जनसंपर्क कार्यालयात आल्या. तेथे येताच सोबत असणाऱ्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून तेलाचे पैसे दिले. त्यामुळे त्यांच्या या कृतीने सगळेच भरवून गेले.