काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर अगदी फुलून गेला होता. इतकी अफाट आणि मोजता न येणारी महिला भगिनींची संख्या पाहून एखाद्या भव्य पर्वाचीच अनुभूती सर्वांना झाली. या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुजय विखेंनी या सर्व महिलांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दिग्गज संगीतकार व अजय अतुल या जोडीने उपस्थित महिलांना आपल्या गाण्यावर ताल धरण्यात भाग पाडले. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांचा उत्साह वाढविला. या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमांव्यतिरिक्त भव्य लकी ड्रॉ स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली.
या कार्यक्रमात महिला संघटन करणाऱ्या अरुणाताई नानाभाऊ कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अर्चना नांगरे आघाव, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या ह.भ.प. उज्वलाताई ठोंबरे, श्रीराम विद्यालय, राळेगण येथे मुख्याध्यापिका या पदावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तारका रंगनाथ भापकर, शिवव्याख्याता प्रणालीताई बाबासाहेब कडूस, कोविड काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉ. निवेदिता माने, अंगणवाडी सेविका विद्या दुसुंगे, युवा वैज्ञानिक श्रुतिका धनंजय दळवी, शिक्षिका सविता मधुकर बोरकर, महिला संघटन करणाऱ्या अनिता आदिनाथ बनकर, महिला सक्षमीकरणासाठी भरीव योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू राजेंद्र वाणी, सोनाली योगेश गहिले, स्मिता मंगेश करडे, सुमन साहेबराव सप्रे, मिराबाई ज्ञानदेव शेळके, लाकडी घाण्यावरून तेल काढण्याचा व्यवसाय सुरू करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अश्विनी कोळपकर, गृह उद्योग सुरू करणाऱ्या मिना बेरड, जगदंबा महिला स्वयंसहायताच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मिना गणेश काटे, सोनुबाई विजय शेवाळे, कोमल वाकळे, प्रणाली बाबासाहेब कडुस आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अजय-अतुल यांच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन श्री. शिवाजीराव कर्डिले यांनी ठेका धरत उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला. उपस्थितांनी देखील अत्यंत उत्साहात हा जल्लोष साजरा केला.