अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा 18 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक सुशिलकुमार श्रीवास्तव यांनी दिली .
नागपूर व पुणे विमानसेवा सुरु करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची मागणी होती. करोनामुळे मध्यंतरी अठरा महिने या विमानतळावरुन विमानसेवा बंद होती. आता विमानसेवा सुरुळीत होत आहे.
सध्या चार ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये बंगलुरूसाठी 02, दिल्ली 01, हैदराबाद 01, चेन्नई 01 अशा पाच विमानफेर्या आहेत. आता पुणे-शिर्डी-नागपूर अशी विमानसेवा सुरु होणार आहे.
पुणे येथून येणारे विमान शिर्डी येथे येईल व तेच विमान नागपूरला जाणार आहे. त्याच दिवशी हे विमान नागपूरवरुन शिर्डीला येईल व तेथून पुणे येथे जाणार आहे.
ही विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरु ठेवण्याचा विमान कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रवासी किती मिळतात, यावरच ही सेवा यामार्गे किती दिवस सुरू ठेवायची याचा पुढील निर्णय होणार आहे.