शेतातील विहिरीची पाहणी करणे बेतले ‘त्याच्या’ जीवावर ..?

Ahmednagar News:शेतात पाहणी करत असताना शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात घडली.

अरुण बन्सी गायकवाड (वय ४६, रा.चास ता.नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.मयत गायकवाड हे चास गावठाणात राहत होते. ते नगर – पुणे महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर कामास होते. काल सकाळी ते मोटारसायकलवर गावच्या परिसरात असलेल्या ब्राम्हणदरा भागात असलेल्या त्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतातील विहिरीत डोकावून पाहत असताना तोल जावून अथवा पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता

शेताजवळ त्यांची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर शेताच्या परिसरात शोध घेण्यात आला. शेवटी एकाने विहिरीत डोकावून पाहिले असता गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला.मयत गायकवाड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुली, १ भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.