अहमदनगर बातम्या

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

Published by
Ahmednagarlive24 Office

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता जोरदार टीकाश्र सोडले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ तिसगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये थोरात हे बोलत होते. यावेळी उमेदवार नीलेश लंके यांच्यासह आ. प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, नसिर शेख, मुन्ना तांबोळी, शिवशंकर राजळे, रफीक शेख, इलियास शेख, संजय मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभेला तिसगांवकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले, तुमच्या पुढे दोन उमेदवार आहेत. एकाकडे खुप धनसंपत्ती आहे, सत्ता आहे तर दुसरा आहे तो सर्वसामान्य कुटूंबातला कर्तुत्ववान उमेदवार आहे. साध्या कुटूंबातून आलेल्या कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान केले पाहिजे असा माझा तुम्हाला आग्रह राहील. गरीबाच्या पोराला संधी मिळणे सोपे नसते मात्र नीलेश लंके यांनी ती मिळविली आहे. कर्तुत्व दाखविले असल्याचे थोरात म्हणाले.

थोरात पुढे म्हणाले, लोकांचे प्रश्‍न सोडविता सोडविता नीलेश लंके आमदार झाले. कोरोना संकटात राज्यात, देशात भयानक परिस्थिती होती. कोणी एकमेकांच्या जवळ जात नव्हते. अशा वेळी लंके यांनी कोरोना रूग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू केले. हजारो रूग्णांना जीवदान दिले. रूग्णांजवळ बसून त्यांना धीर दिला.

हे धाडस लंके हेच करू शकतात. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याची ओढ त्यांच्याकडे असून एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मोठी लोकप्रियता त्यांनी मिळविली आहे. दक्षिण नगर मतदारसंघातील तरूणांशी असलेला त्यांचा संपर्क पाहता पुढचा खासदारकीचा उमेदवार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला त्यावेळी लंके यांचेच नाव घेतले जायचे असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

निर्यातबंदी केवळ गुजरातपुतीच उठविली

एकीकडे निर्यात बंदी उठविली म्हणता, तर दुसरीकडे कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी रस्त्यावर आले आहेत. आंदोलने सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कांद्याची निर्यातबंदी फक्त गुजरातकरता उठविली आपल्याकरता नसल्याचे सांगत थोरात यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

लंके यांचा मोठा विजय होणार

नीलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे तरूणांमध्ये स्फुर्ती पहावयास मिळत आहे. कोठेही गेले तरी हजारो लोक त्यांच्या स्वागताला उपस्थित असतात. त्यामुळे लंके यांचा विजय मोठा होणार आहे. पुढाऱ्यांच्या काही अडचणी असतील, तुम्ही पुढाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. लंके यांनाच मतदान करायचे हे ठरवून टाका असे थोरात म्हणाले.

संसदेमध्ये लंकेंविषयी उत्सुकता असेल

नीलेश लंके ज्यावेळी लोकसभेत जातील त्यावेळी खासदारांमध्ये कोण आहेत नीलेश लंके हे पाहण्याची उत्सुकता असेल. इतक्या मोठया धनदांडग्या उमेदवाराविरोधात कसे निवडूण आले ? किती मतांनी विजय झाला ? याचीही विचारणा होईल, त्यासाठी मताधिक्क्याचा आकडाही दोन लाखांपेक्षा अधिक हवा असे आवाहन मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

हेलीकॉप्टरवाले झाडाखाली जेवत नसतात !

नगर-पाथर्डी रस्ता झाल्यानंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. झाडाखाली जेवायला बसले. मात्र झाडाखाली आम्हीच बसू जाणं !हेलीकॉप्टरवाले कधी झाडाखाली जेवत नाहीत. कुणी कुणाचे काम करू शकत नाही. नीलेश लंके रोडवरही बसू शकतो, वाहतूकीची कोंडी दुर करू शकतो. ते तुम्हाला जमणार नाही. त्यांना फक्त फुकटचे श्रेय घेण्याची सवय लागली असल्याचा टोला लंके यांनी लगावला.

पुढचे सरकार महाविकास आघाडीचेच

महाविकास आघाडीचे सरकार आले आणि तीन वर्षे या भागाला वांबोरी चारीचे पाणी आले. महायुतीचे सरकार आल्यानंतर मात्र हे पाणी बंद झाले. पुढचे सरकार महाविकास आघाडीचेच येणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत तुम्हाला परिवर्तन करावे लागणार आहे. नीलेश लंके उमेदवार तिसगाव, ता. पाथर्डी येथे झालेल्या प्रचार सभेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office