अहमदनगर बातम्या

अतिक्रमणांचा प्रश्न आता माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या दरबारात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवरील ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मध्ये झालेल्या तीनशेहून अधिक अतिक्रमणधारकांची धाकधूक वाढली असून, न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर या प्रकरणात काहीतरी तडजोड करावी,

यासाठी तिसगाव येथील सर्वच राजकीय नेते मंडळींनी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे धाव घेत या प्रकरणात लक्ष घालून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तिसगाव येथील गटनंबर २९६ मध्ये सुमारे ३०० लोकांनी अतिक्रमण केल्याची प्राथमिक चर्चा असून, याच गटांबरमध्ये असलेली लिंगायत समाजाची सुमारे ४२ गुंठे स्मशानभूमीची जागा अतिक्रमणाने व्यापली आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठीसुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही.

याच स्मशानभूमीच्या जागेमध्ये शासनाचे तलाठी कार्यालय देखील उभारण्यात आलेले असून, यासाठी पंधरा ते वीस गुंठे जागा वापरण्यात आलेली आहे. कागदपत्रांच्या आधारे लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये इतरंबरोबरच प्रशासनानेदेखील अतिक्रमण केले की काय, अशी या समाजामधून भावना व्यक्त केली जात आहे.

या सर्व बाबींचा १५० दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतला दिलेले असून, यासाठी आता केवळ १५ ते २० दिवस शिल्लक राहिल्यामुळे गावपातळीवर व तालुका पातळीवर चर्चा बैठका सुरू आहेत.

मात्र, ठोस मार्ग निघालेला नाही त्यामुळे या प्रकरणात माजीमंत्री कर्डिले यांनी लक्ष घालावे. तिसगाव त्यांच्या मतदारसंघात असून, ते यावर निश्चितपणे मार्ग काढू शकतात, अशी भावना तिसगावमधील अनेकांची असल्याने तिसगावमधील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अतिक्रमणधारकांची कर्डिले यांच्यासोबत औपचारिक चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

लिंगायत समाजाचे प्रतिनिधी व याचिकाकर्त्यांचीदेखील भूमिका, या प्रकरणात महत्त्वाची असून, माजी मंत्री कर्डिले या महत्त्वाच्या व्यक्तींशीदेखील चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे तिसगावच्या नेतेमंडळींनी हा विषय माजी मंत्री कर्डिले यांच्यावर सोपवला असून, ते हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळतात, याकडे तिसगावकरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे तिसगावच्या अतिक्रमणांचा विषय कर्डिलेंच्या दरबारात पोहोचला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office