अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन धरण म्हणून ख्याती असणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुप्तचर विभागाने भंडारदरा धरणास दिलेल्या भेटी दरम्यान धरणाच्या सुरक्षेच्या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे धरणावरुन स्थानिक नागरीक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे ब्रिटीशकालीन धरण आहे. या धरणास आता शंभर वर्ष पुर्ण होत आले आहेत. त्या दृष्टीने नुकतीच भंडारदरा धरणास संबंधित अधिकाऱ्यांनी भेट दिली व पाहणी केली.
या दरम्यान त्यांना धरणाच्या भिंतीवरून खासगी व्यक्ती तसेच कॉलेजचे विद्यार्थी जाताना निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून धरणावरुन वाहनांनाही प्रवेश देऊ नये, असे सक्त आदेश काढले आहेत.
धरणाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या पोलिस कर्मचारी वर्गाची अपुरी संख्या या संदर्भातही महत्वाच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. भंडारदरा धरणावरुन जाणारे स्थानिक नागरीक हे आसपासच्या गावातीलच स्थानिक रहिवासी आहेत.
त्या लोकांसाठी धरणावरुन कायमस्वरुपी जाण्या- येण्याचा मार्ग आहे. हे अंतर जवळ पडत असल्याने स्थानिक आसपासच्या गावातील नागरीकांना भंडारदरा धरणावरुन जाण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.
धरणाच्या दोन्हीही प्रवेशद्वारावरील सुरक्षा ही कुचकामी आहे. स्थानिक नागरीकांपासून धरणाच्या सुरक्षेस कोणताही धोका नसून अगोदर प्रवेशद्वारावर असणारी सुरक्षा धरण शाखेने अधिक प्रबळ करावी, असे मत धरणावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले आहे.