Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एमआयडीसी वरदान ठरतील ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तरुणांसाठी एमआयडीसी मोठा आधार ठरू शकणार आहेत.
परंतु नवीन एमआयडीसी होतील तेव्हा होतील परंतु सध्या जिल्ह्यातील आहे त्याच एमआयडीसींचे वास्तव भयानक आहे. श्रीरामपूर एमआयडीसीला देखील मोठ्या नवसंजीवनीची गरज आहे. या एमआयडीसीत ३०० हुन अधिक कारखाने असल्याची माहिती मिळाली आहे.
यातील पैकी ३० कारखाने पूर्णतः थांबले आहेत, तर सुमारे ७५ कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अर्थात, शंभरहून अधिक कारखाने ‘सिक युनिट’मध्ये गेल्याने या एमआयडीसीला आता नवसंजीवनीची गरज आहे.
‘अशी’ झालीये अवस्था !
श्रीरामपूर एमआयडीसीचा साडे बाराशे एकर पसारा असून यात ३०० हून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. येथे जवळपास पाच हजार लोकांना रोजगार निर्माण झाला. परंतु आता यातील ३० कारखान्यांना टाळे लागले असून ७५ हून अधिक कारखाने बिकट अवस्थेत आहेत.
रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सुविधा असल्या तरी वर्षभरापूर्वी झालेल्या सुमार दर्जाच्या रस्त्यांची अवस्था सध्या दयनिय आहे. मिळणारी वीजही पुरेशी नाही अशी तक्रार नेहमीच असते. विशेष म्हणजे या एमआयडीसीमध्ये बँका नाही की पोस्ट ऑफीस नाही, कँटिन नाही की सीसी टिव्हीची सुविधा नाही. पोलिस चौकी झाली ती देखील एमआयडीसीच्या बाहेर आहे.
काही कारखानदार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विल्हेवाट न लावता कारखान्यातील वेस्टेज परिसरातील सरकारी जागेत टाकतात. शहरातील इतर व्यापारी, छोटे उद्योजक आपले सांडपाणी टैंकरमध्ये भरून येथील रिकाम्या जागेत सोडतात.
औद्योगिक विभागाचे कार्यालयाने अशा उद्योजकांवर कारवाई करणे गजरजेचे असते. मात्र येथील कार्यालयात एकाही अधिका-याची नेमणूक नाही. अशा दृष्टचक्रात सापडलेल्या एमआयडीसीमध्ये सार्वजनिक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र, (सी. ई. टि. पी) नसल्याने अद्याप श्रीरामपूर एमआयडीसींचा समावेश केमीकेल झोनमध्ये होऊ शकलेला नाही हे वास्तव आहे.