Ahmednagar News : खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा ठराव विशेष ग्रामसभेत मंजुर करण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत १३ ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या करून विभाजनाच्या ठरावास पाठिंबा दिला. ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने सर्वानुमते मंजूर झाल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी जाहीर केले.
गेली १३ दिवसांपासून खर्डा ग्रामपंचायतच्या विभाजनाचा मुद्दा गाजला होता. दि. १२ जुलै रोजी घेण्यात आलेला ग्रामसभेचा ठराव काही ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक मीटिंगमध्ये घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे तापला होता त्यातच दि. २३ जुलै रोजी खर्डा गाव बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने सोमवार दि. २४ जुलै रोजी खर्डा ग्रामपंचायतने स्वतंत्र ग्रामपंचायत विभाजन करण्याच्या एकमेव मुद्द्यावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रचंड ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. प्रथम प्रचंड गदारोळात सुरू झालेल्या ग्रामसभेला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु एकमेव मुद्दा घेऊन खर्डा ग्रामपंचायतचे स्वतंत्र विभाजन करण्याच्या विषयावर चर्चा होऊन. तो त्या मंजूर ठरावावर सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील उपसरपंचासह १३ ग्रामपंचायत सदस्यांनी सह्या करून पाठिंबा दिला.
त्यानंतर ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने सर्वानुमते मंजूर झाल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी जाहीर केले. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. यावेळी ४ ग्रामपंचायत सदस्य गैरहजर होते. आता इथून पुढे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक व नंतर ग्रामविकास मंत्रालय पुढे सादर केला जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने खर्डा ग्रामपंचायत स्वतंत्र होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
याबाबत कोणकोणते राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी सहकार्य करतात हे पाहणे सुद्धा पुढील काळात औत्सुक्याचे ठरणार आहे. खर्डा ग्रामपंचायतने स्वतंत्र ग्रामपंचायत विभाजनाचा ठराव ग्रामसभेत एकमताने घेतला आहे. तसेच आम्ही सर्वांनी या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. तसेच येथून पुढच्या काळात विकास कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे पूर्ण सहकार्य करून खर्डा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.- संजीवनी वैजीनाथ पाटील, सरपंच खर्डा