अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- प्रामाणिकपणा अजून हरवलेला नाही, हे नगरचे रिक्षाचालक चांगदेव आव्हाड यांनी दाखवून दिले. मुंबईतील अर्चना कुमार रामादिन व त्यांचा मुलगा आशुतोष हे गुरूवारी नगरला आले.
नेप्तीनाक्यावर उतरल्यावर ते रिक्षा (एमएच १६ – बीसी ०३१२) करून केडगावातील घरी गेले. त्यांच्याकडे सहा बॅगा होत्या. उतरताना त्यातील एक राहून गेली. बॅग नेमकी कुठे राहिली, हे लक्षात येईना.
रात्री तपोवन रस्त्यावरील आपल्या घरी गेल्यावर रिक्षाचालक आव्हाड यांना ही बॅग दिसली. आतील एक बिलावर त्यांना मोबाइल क्रमांक दिसला. त्यावरून त्यांनी रामादिन यांच्याशी संपर्क साधत रिक्षात बॅग विसरली का, याबाबत विचारणा केली.
दुसऱ्या दिवशी माळीवाडा बसस्थानकावर आव्हाड बॅग घेऊन आले व त्यांनी ती प्रामाणिकपणे रामादिन यांच्या सुपूर्द केली. या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे असल्याने रामादिन परिवार काळजीत होता. बॅग पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी आव्हाड यांना बक्षीस देऊन त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.