Ahmednagar News : नगर तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयानबाहेर रोडरोमिओंनी उच्छाद मांडला असून, यातून अनेक तरुणींना छेडछाडीचे प्रकार वाढताना सध्या दिसून येत आहेत. या वाढत्या रोडरोमिओंच्या त्रासापोटी अनेक मुली बंद शिक्षण करण्याच्या मानसिकतेत आहेत.
याबाबत पोलिसांनी योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक वर्गामधुन व्यक्त केली जात आहे. तसेच विद्यार्थीनींच्या याबाबतीत आत्मसरंक्षणाचे धडे देवून योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
सध्या सर्व शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. नगर तालुक्यातील अनेक शाळा महाविद्यालयानबाहेर रस्त्यावर जोरजोरात गाड्या उडवून फिरणारे रोडरोमिओ, शाळा, महाविद्यालयांचे गेट, बसस्थानकावर गर्दी करणाऱ्यांमुळे शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
सायलेन्सरला फटाक्याचे आवाज लावून वेगात गाडी पळवल्याने अपघात होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लावण्यासाठी नगर तालुक्यात ग्रामीण भागात पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात देखील रोडरोडिओंचा मोठा त्रास वाढला आहे. शाळा महाविद्यालयांसमोर दुचाकी गाड्या वेगाने पळवणे, वेगवेगळ्या आवाजात हॉर्न वाजविणे, शाळा, कॉलेजबाहेर विद्यार्थिनींची छेडछाड करणे आदी प्रकारात वाढ होत असुन याचा नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.