अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राज्यात चर्मकार समाजावर अत्याचाराचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मागील दोन ते तीन महिन्यात अनेक चर्मकार समाजातील महिलांवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
समाजाची परिस्थिती बिकट बनत असताना चर्मकार समाजातील युवकांचा रोजगार व कुटुंबाच्या उदरनिर्वाचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून मागील पाच वर्षाच्या कालावधीत एकही होतकरु युवकाचे कर्ज प्रकरण मंजूर झालेले नाही.
चर्मकार समाजावर वाढते अत्याचार थांबण्यासाठी व चर्मकार विकास महामंडळास भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासह समाजाच्या विविध प्रश्नासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची भावना राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजातील विविध प्रश्न शानस्तरावर मांडण्यासाठी जनजागरण अभियान सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष गायकवाड नगरमध्ये आले असता त्यांनी पदाधिकार्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नाबाबत माहिती घेतली.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य कैलास गांगर्डे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले, शहर उपजिल्हाध्यक्ष अभिनव सुर्यवंशी, उपजिल्हाध्यक्ष संतोष त्रिंबके आदि कार्यकर्ते उपस्थित होते. जुने बस स्थानक येथील एका हॉटेलमध्ये प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकित राज्य कार्यकारणी सदस्य कैलास गांगर्डे, युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे व शहर जिल्हाध्यक्ष संतोष उदमले यांनी जिल्ह्यातील चर्मकार समाजाचे विविध प्रश्नांचा आढावा घेतला. अहमदनगर जिल्ह्यात संघटनेचे उत्तमपणे सुरु असलेल्या कार्याचे गायकवाड यांनी कौतुक केले.