Ahmednagar News : जिल्ह्यातील सर्वच नदीकाठच्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. या वाळू उपशामुळे परिसरातील शांतता धोक्यात येत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्यामुळे असा वाळूउपसा रोखण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. मात्र तरी देखील वाळूतस्कर वाळूची वाहतुक करतात.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू तस्करीस लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात नाल्या खोदल्या होत्या.
या नाल्यामुळे वाळूतस्करांना आपली वाहने नदीपात्रात नेने शक्य होत नसल्याने काही काळ या भागातील वाळू तस्करी थांबली होती. मात्र केवळ नाल्या खोदल्या म्हणून वाळू तस्करी बंद करतील ते वाळूतस्कर कसले.
या भागातील वाळूतस्करांनी महसूलने खोदलेल्या नाल्या बुजवून वाळू तस्करी जोरात सुरू आहे. कोळगाव थडी गोदावरी नदी पात्रात उतरण्यासाठी वाळू तस्करांनी जुने गावठाण गायरान हद्दीतील खडकीनाला बुजवून वनविभागाच्या राखीव वनामधून दोन किलोमीटर लांब, तीस फूट रुंद वृक्षसंपदा तोडून अवैध रस्ता तयार करत.
गोदावरी नदीपात्रातून चार महिन्याच्या कालावधीमध्ये सात हजार ब्रासपेक्षा अधिक वाळूचा अवैध उपसा करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला आहे.
यापूर्वीचे महसूल अधिकारी नाल्या बुजवणाऱ्याचा गोपनीय शोध घेऊन पोलीस कारवाई करत असल्याने वाळू तस्करी आटोक्यात होती.
आज तालुक्यात महसूल विभागाच्या ठोस कारवाईची गरज असताना अवैध वाळूतस्करीला प्रतिबंध करणाऱ्या पथकाचे काही कर्मचारी वाळू तस्करीस प्रोत्साहन देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकवण्यापर्यंत वाळू तस्करांची मजल जात आहे.
पथक आल्याची खबर तस्करांना वेळीच मिळत असल्याने वाहने पसार होऊन पथक रिकाम्या हाताने परतल्याचा देखावा वेळोवेळी बघायला मिळतो. साठ टनांपर्यंत अवजड डंपरने वाळू वाहतूक होत असल्याने कोळगावथडी, माहेगाव – कोळपेवाडी रस्त्याची पुरती वाट लागली आहे.
वाळू तस्कराच्या आपसातील कायमच्या वादामुळे गावाची शांतता धोक्यात येऊन सर्वसामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.