अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच राहतील. गावातून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
या समितीचे सदस्य सचिव म्हणून पोलिस पाटील काम पाहणार आहेत. तलाठी व ग्रामसेवक सदस्य असणार आहेत. ज्या गावात पोलिस पाटील नाहीत, त्या ठिकाणी ग्रामसेवक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
जिल्ह्यात आतापर्यंत ४३ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या भागात करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तेथे भाग सीलसुद्धा करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागात ऊसतोड कामगार, परराज्यातील नागरिक, पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्ये गावातील व्यक्ती, गावाबाहेरील व्यक्ती, गावातील व्यक्तीचे नातेवाईक, मित्र, हितचिंतकांचा समावेश आहे.
तहसीलदारांनी माहिती दिली तरच प्रवेश द्या
बाहेरून गावात वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींना परवानगी नसल्यास गावात प्रवेश देऊ नये, परवानगी असल्यास तहसीलदारांना माहिती दिल्यानंतरच गावात प्रवेश द्यावा, बाहेरून गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींचे नाव व इतर सविस्तर तपशील यांची नोंद समितीच्या सदस्य सचिवांनी ठेवावी, असे म्हटले आहे.
खर्च ग्रामपंचायतीला करावा लागणार
बाहेरून गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत तत्काळ तपासणी करावी. बाहेरून गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींचे पुढील १४ दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक राहील. तसे संबंधितांच्या हातावर शिक्के मारण्यात यावेत.
बाहेरून गावात वास्तव्यास आलेल्या व्यक्तींसाठी संस्थात्मक विलगीकरणासाठी इमारत (उदा. जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी भवन) सुनिश्चित करून ठेवावी, संबंधित व्यक्तींची व इमारतीची देखभाल व सुरक्षा संबंधित ग्रामपंचायतीने करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®