Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीत सचिव पदाचा पदभार घेण्यासाठी गेलेल्या सचिव किशोर काळे यांच्या वाहनाच्या काचा फोडून त्यांना व त्यांच्या नातेवाईकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच उघकीस आली.
याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांच्यासह दहा जणांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही कारणांमुळे सचिव किशोर काळे यांना बाजार समितीच्या सचिव पदावरून हटवण्यात आले होते.
या कार्यवाहीला काळे यांनी आव्हान दिले. यात काळे यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर जिल्हा निबंधक व विभागीय आयुक्तांनी काळे यांना सचिव पदावर हजर करून घेण्याचा आदेश दिला. या निर्णयाविरोधात सत्ताधारी गटाने सहकार व पणन मंत्री तसेच उच्च न्यायालयात अपिल केले.
न्यायालयाने निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा आदेश पणन मंत्रालयाला दिला होता. त्यानुसार पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विभागीय आयुक्तांचे आदेश कायम ठेवले.
हा निकाल जिल्हा निबंधकांना दिल्यानंतर पदभार घेण्यासाठीचा काळे यांनी बाजार समितीला अर्ज देत अहवाल सादर केला. काळे यांनी पदभाराचा अर्ज बाजार समितीला दिला, त्यावेळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी व सहाय्यक निबंधक संदीप रूद्राक्ष हेही कामानिमित्त तिथे उपस्थित होते.
यावेळीही पुरी यांनी अहवाल सादर करण्यासंदर्भात त्यांना सूचना केली. ते गेल्यानंतर मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काळे यांनी इतिवृत्त मागितले, असता ते देण्यास प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी नकार दिला.
त्यानंतर काळे बाजार समितीच्या बाहेर आले असता दहा ते १२ जणांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्यासमवेत असलेले कैलास भणगे यांना मारहाण केली.
काळे यांनी तेथून आपला बचाव करत शहर पोलिसांकडे गेले. या मारहाण प्रकरणी त्यांनी वाबळे यांच्यासह दहा ते १२ जणांविरूद्ध फिर्याद दिली. त्यावरुन श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
चुकीच्या कामाला पाठिंबा नाही
या सर्व प्रकारावर सभापती सुधीर नवले म्हणाले, आपला चुकीच्या कामाला पाठिंबा नाही. चुकीचे होत असेल तर त्याला पाठीशी घालणार नाही. सहाय्यक निबंधक रुद्राक्ष यांनी देखील या प्रकारावर चिंता व्यक्त केली.
बाजार समिती ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहेत. सचिव पदावरून मनमानी सुरू आहे. काळे यांचा पदावन्नतचा, तर वाबळे यांचा पदोन्नतीचा अर्ज पणन मंडळाने फेटाळला आहे. त्यामुळे नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केली जावी, असे त्यांनी सांगितले.