अहमदनगर बातम्या

रात्री जेवण करून झोपलेल्या वृद्धासोबत घडले असे धक्कादायक कृत्य ;कुटुंबियांनी पाहताच केला एकच आक्रोश

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : रात्री जेवण करून घराजवळअसलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या वृद्धाच्या डोक्यात कोणत्या तरी हत्याराने मारुन खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील झोळे शिवारात घडली आहे.

सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. साहेबराव भिमाजी उनवणे (वय ७७) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील झोळे येथील साहेबराव उनवणे हे नेहमीप्रमाणे जेवण करुन घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. त्यानंतर रात्री साडेअकरा ते सकाळी सहा वाजेपूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारुन खून केला.

दररम्यान सकाळी उनवणे यांची सून बाहेर आली असता तिला सासरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे धक्कादायक दृश्य कुटुंबियांनी पाहताच एकच आक्रोश झाला. मयत वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना याबाबत माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोना. अमित महाजन आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर तत्काळ श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले. तसेच तपासाकामी वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आले. याप्रकरणी खून झालेल्या वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे हे करत आहे. या घटनेने झोळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office