Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावसह अनेक गावांत यावर्षी जेमतेमच पाऊस झाला, त्यामुळे कपाशी पिकाचा खर्चही निघणे मुश्किल असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कमी पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही भीषण होण्याची चिन्हे आहेत.
ढोरजळगाव व परिसरातील गावांमध्ये यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्याने पिके शेवटच्या घटका मोजत असताना सप्टेंबर महिन्यात थोड्याफार झालेल्या पावसावर कपाशीला कशीबशी पाच ते दहा बोंडे लागली,
इतर पिकांचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, पिकांवर केलेला खर्चही निघणे अवघड होणार आहे. पुढील नोहेंबर नंतर पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भीक्ष्य जाणवणार आहे.
यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात विहिरींच्या पाण्याची वाढ होईल, असा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे पाणीपातळीही खालावलेलीच असून, पुढील महिन्यातच विहिरी व कूपनलिका तळ गाठतील, अशी परिस्थिती आहे.
यावर्षी परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. गेल्या २०१९ ते २०२२ या कालावधीत जोरदार व चांगला पाऊस झाल्याने ऊस पिकासह कपाशीसह इतर पिकांचे मागील काही वर्षांत चांगले उत्पादन झाले होते;परंतु यावषी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संक्रात येणार आहे.