निळवंडे धरणाच्या पाण्यावरून संगमनेर आणि कोपरगावच्या ‘त्या’ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी ! ६ जणांवर गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : निळवंडे धरणातील कालव्याच्या डाव्या पाण्यावरून संगमनेर – कोपरगाव या दोन तालुक्यातील गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. पाटबंधारे खात्याच्या ४८ तासांन पाणी बंद करण्याच्या आदेशानुसार झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाली आहे. संगमनेर तालुका पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील वडझरी येथून कोपरगावकडे जाणारे पाणी अडविल्याने दगड फेक झाली. यामुळे २ जण जखमी झाले असून त्यांना घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर कांदळकर व एकनाथ कांदळकर यांच्या डोक्याला मार लागला आहे. कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी बेकायदेशीरपणे बंधारे फोडल्याचा आरोप शरद गोर्डे यांनी केला आहे.

४८ तास पाणी सोडण्याची मुदत संपल्यामुळे वडझरी येथील कांदळकर यांनी पाणी अडवले होते. याचा राग धरून त्यांना मारहाण केली असल्याचा आरोप गोर्डे यांनी केला आहे.

या संदर्भात सूर्यवंशी यांच्या विरोधात प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाऊस न झाल्यामुळे सध्या सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा काळात आलेले पाटाचे पाणी शेतकऱ्यांना संजीवनी ठरले आहे.

कालव्यानजीक असणारे बंधारे ओढ्यानाल्यामध्ये पाणी जिरविण्याचे काम शेतकरी करत आहे. शेतीसाठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असल्यामुळे पाण्यासाठीचा संघर्ष येथून पुढे अटळ आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वर कांदळकर यांनी संगमनेर तालुका पोलिसात तक्रार दिली असून आण्णा गांजवे, गजानन गांजवे, शांताराम मोरे, विजय गोरे, गजानन मधे, सुखलाल गांजवे (मणेगाव, तालुका कोपरगाव) आदी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.