Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी नगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नगरची राजकीय, सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. नागरिक प्रचंड दहशतीखाली जगत आहे.
नगरची अवस्था बिहारसारखी दिसते. येथील आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींच्या अनेक फाईल्स आल्या आहेत. सरकारच्या पाठबळामुळे ते नगरमध्ये गुंडगिरी व ताबेमारी करीत आहेत खा. संजय राऊत यांनी केला.
नगरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानिमित्त खा. राऊत नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत अनेक गुंडांनी खंडणी, जमीन बळकवणे आदी गोष्टी केल्या. परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली.
तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड असे म्हणत त्यांना रस्त्यावर उतरून आम्ही विरोध केला. त्यामुळे ते पळून गेले. अशाच पध्दतीने आता नगरमध्येही गुंडगिरी व ताबेमारीविरूध्द शिवसेना उभी राहणार आहे. माझ्याकडे या आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी विरोधात तक्रारींच्या फाइल्स आल्या आहे. महाराष्ट्रात गृहमंत्री आहे की नाही? येथील ताबेमारीचा पैसा त्यांच्यापर्यंत तर जात नाही ना?
असा प्रश्न पडतो, असेही राऊत म्हणाले. एकीकडे राम राम म्हणत मार्केटिंग करायचे व दुसरीकडे देवस्थानच्या व शैक्षणिक संस्थांच्या जमिनी, भूखंड, शिवसेना नगरसेवकांची कामे लुटली जात आहेत. काँग्रेसचे शहर पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहेत.
व्यापाऱ्यांनीही तक्रारी केल्या आहे, त्यांना काम करणेही मुश्किल झाले आहे. माजी आमदार स्व. अनिल राठोड यांनी गुंडगिरी व झुंडशाही बिरोधात टक्कर दिली आहे. त्यांच्या निधनाने शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवत आहे असे राऊत म्हणाले.
ताबेमारी करणाऱ्याच्या घरावर मोर्चा काढणार
खा. संजय राऊत म्हणाले, नगरमधील ही गुंडगिरी, तांबेमारी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. मुंबईत गुंडगिरीविरूध्द शिवसेना जशी लढली व संघर्ष केला तसाच नगरमध्ये केला जाईल. ताबेमारी करणाऱ्याच्या घरावर व जिल्हा प्रशासनावर महाविकास आघाडीच्या वतीने विराट मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी दिला.