Ahmednagar News : शेतजमिनीच्या जुन्या वादातून सावत्र मुलाने शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून पेटवून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खुणेगाव येथील जोहराबी कादर सय्यद (वय ४८) या महिलेने नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, माझे खुणेगाव गावाचे शिवारात शेतीमध्ये घर असून एक एकर शेतात सध्या १८ महिने वयाचे ऊसाचे पीक आहे.
ते सध्या तोडीस आलेले आहे. माझा सावत्र मुलगा निसार कादर सय्यद व आमचा शेतजमिनीचा जुना वाद आहे. त्यावरुन सतत तो मला शिवीगाळ व दमदाटी करत असतो. त्याच कारणावरुन त्याने मला मागील दोन दिवसांपूर्वी “तुझ्या शेतातील ऊसाच्या खोडक्या करेन, जाळून टाकीन”, अशी त्याने धमकी दिली होती,
परंतु मी त्याकडे लक्ष दिले नाही. शनिवारी (दि. २३) रात्री १० वाजेच्या सुमारास मी व माझे पती कादर असे जेवण करून घरी झोपी गेलो, रात्री पावने बारा वाजेच्या सुमारास मला शेजारील आयुब सय्यद व दिपक पोटे यांनी फोन करुन कळविले की, तुमच्या शेतातील उसाच्या पिकास आग लागली आहे,
या ठिकाणी मी माझ्या पतीसोबत जावुन पाहिले असता उसाला आग लागलेली होती. आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात न येता संपुर्ण ऊसाचे पीक जळून गेले. यात माझे मोठे नुकसान झाले.
सावत्र मुलगा निसार कादर सय्यद यानेच ऊस पेटवून दिला आहे. या फिर्यादिवरुन आरोपीविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४३५, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.