अहमदनगर बातम्या

योगा अभ्यास जसा महत्त्वाचा आहे तसाच आयुर्वेद अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. – राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे.

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- मानवी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ज्या प्रकारे योगअभ्यास महत्त्वाचा त्याप्रमाणे आयुर्वेद अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे. आयुर्वेद आपले मूळ आहे.

आयुर्वेद हे भारताचे वैशिष्ट्य आहे. आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार झाला पाहिजे. असे प्रतिपादन राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन व डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले.

त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,

कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, प्रवरा मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त मोनिका सावंत इनामदार यांची प्रमुख उपस्थित होती. श्री.कोश्यारी पुढे म्हणाले, उपचारासाठी अलोपॅथीचे आरोग्य क्षेत्रात महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद व योगा महत्त्वाचा आहे. आयुर्वेद हा सर्वात जूना वेद आहे. आज आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे.

तरी सुद्धा आज आपण आपल्या परंपरेत असलेल्या आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहीतेमध्ये ‘गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा’ ही जीवनशैली नमूद केली आहे. असे नमूद करून राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले,

आयुर्वेदाचे महत्त्व ओळखत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र ‘आयुष्य मंत्रालय’ स्थापन केले आहे. स्वस्त किंमतीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात ‘जन औषधी केंद्र’ स्थापन झालेले आहेत.

योगाचा प्रचार-प्रसारांवर त्यांचा भर राहिलेला आहे. २१ जून हा योग दिन म्हणून आपण देशभर साजरा करत आहोत. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ने सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी भरीव योगदान दिले आहे आणि आता आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सुरू करून नवीन क्षेत्रात पाऊल टाकले आहे‌.

असे गौरवोद्गार ही श्री.कोश्यारी यांनी यावेळी काढले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.राजेंद्र विखे-पाटील यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली.

डॉ.व्ही.एन.मगरे यांनी प्रास्ताविक केले. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ahmednagarlive24 Office