अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद होती, मात्र आता एक महिन्यापासून धार्मिक देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.
भाविकांची गर्दी पाहता तेथील सक्तीची शनिपूजा घेण्यासाठी दूरवरून लटकू भाविकांच्या वाहनांचा भरधाव वेगाने पाठलाग करत असताना निष्पाप लोक बळी पडले आहेत.
त्यामुळे शनिभक्तांना मोकळ्या मनाने दर्शन घेता यावे म्हणून शनिशिंगणापूर व रस्त्यावरील लटकू हद्दपार करण्याचा निर्णय शनिशिंगणापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
या अगोदर कित्येक वेळा लटकू हटाव मोहीम राबविण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर केवळ थातुरमातूर कारवाईचा बडगा उगारला जातो, व परत परिस्थिती जैसे थे होत असते.
याची मोठी किंमत भाविकांना मोजावी लागत असल्याचे दिसून आले. यात कोणाचाही धाक नसल्याने भाविकांना लुटण्याचा फंडा शनिशिंगणापुरात गाळेधारक व लटकू करत आहेत.
यामुळे या समस्यांवर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या आयोजित बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने भेसळयुक्त तेल वापरू नये, लटकू रस्त्यावर दिसता कामा नये, शनी पूजा वाढीव दर आकारू नये आदी सूचना देण्यात आल्या. यावेळी गाळेधारक, पार्किंग मालक, व्यावसायिक यांनी उपस्थित राहून ठाम निर्णय घेतला.