अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनांचा वेग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रात्री अपरात्री होणाऱ्या चोरीच्या घटना आता तर खुलेआम दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नुकतेच शहरात अशाच एका चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 50 हजार रूपयांची रक्कम चोरून नेली. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या नगर कार्यालयाच्या आवारात सकाळी पावणे बाराच्या सुमारास चोरीची ही घटना घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौस अमिर शेख (वय- 48 रा. गोविंदपूरा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शेख हे फिटनेस ट्रेनर आहेत.
ते त्यांची दुचाकी (क्र. एमएच- 16 बीएन- 7908) घेऊन सकाळी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या नगर कार्यालयात आले होते. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये 2 लाख 50 हजार रूपयांची रक्कम होती.
त्यांनी कार्यालयाच्या आवारात दुचाकी पार्क केल्यानंतर ते कामानिमित्त कार्यालयात गेले होते. यानंतर अज्ञात चोरट्यांनी डिक्कीचा लॉक तोडून डिक्कीमधून अडीच लाखाची रोकड लंपास केली.
शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.