अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या घरे लुटली जात आहे यामुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान चोरी करणाऱ्या चोरट्यांचा एक प्लॅन सतर्क श्वानमुळे धुळीस मिळाला आहे. हा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे सुहास पवार यांचे चारचाकी वाहने दुरुस्तीचे गॅरेज आहे. घारगावपासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे घर आहे. घराच्यासमोर गॅरेज आहे.
पहाटे दोन वाजता चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरील दुचाकीचे लॉक डुप्लिकेट चावीने उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉक उघडले नाही.
नंतर चपला हातात घेऊन हळूहळू चालत जाऊन त्यांच्या दुकानाच्या गाळ्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. तोही असफल झाल्यानंतर वरच्या मजल्यावर चढण्याचा प्रयत्न केला असता याचा सुगावा सुहास पवार यांचा पाळीव श्वानास लागला.
त्याने जोरजोरात भुंकून चोरट्यांच्या मागे धावून त्यांना पळवून लावले. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने सुहास पवार यांना जाग आली. यानंतर त्यांनी सीटीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना घडलेला हा प्रकार लक्षात आला