मेडिकलचे शटर उचकटून चोरटयांनी मुद्देमाल केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे, पोलीस प्रशासनाचा धाक न राहिल्याने चोरी, लुटमारी आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच अशीच एक लुटमारीची घटना शहरात घडली आहे.

बुरुडगाव रोडवर नक्षत्र लॉन जवळ साईनगर कमानीच्या समोर असलेल्या दत्त मेडीकल या औषधी दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील 45 हजारांची रोख रक्कम व कॉस्मेटीक वस्तुंची चोरी झाल्याची घटना गुरुवारी (दि.17) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत मेडीकलचे चालक रोहन महावीर बोरा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोरा यांचे दत्त मेडीकल असून ते बुधवारी (दि.16) रात्री मेडीकल बंद करुन घरी गेले होते.

गुरुवारी (दि.17) पहाटे त्यांच्या मेडीकलच्या दुकानाचे शटर उघडे असल्याचे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी बोरा यांना कळविले असता ते तातडीने मेडीकलमध्ये आले.

त्यावेळी मेडीकल मधील गल्ल्यात असलेली 45 हजार रुपयांची रोकड तसेच मेडीकलमधील काही कॉस्मेटीक वस्तू चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही घटना कोतवाली पोलिसांना कळविली.

पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. याबाबत दुपारी बोरा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24