मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लागेना; ग्रामस्थांनी दिला इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-   19 नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभार्‍याचे कुलूप तोडून चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेला एक महिना झाला आहे.

मात्र अद्यापही चोरट्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ पुन्हा संतप्त झाले असून पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नुकत्याच झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दिला आहे.

मंदिरातील चोरी प्रकरणामुळे आता थेट संतप्त ग्रामस्थ व पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. आचारसंहितेमुळे आंदोलन करू नका अन्यथा गुन्हे दाखल करू असा इशारा यावेळी पोलीस अधिकार्‍यांनी दिला.

यामुळे हा प्रश्न अजून चिघळला आहे. यावर आक्रमक गावकऱ्यांनी देखील प्रत्युत्तर देत पोलिसांना आव्हान दिले आहे. दरम्यान या चोरी प्रकरणी सोनई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती.

न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पण पोलीस कोठडी मिळवूनही या संशयित आरोपीकडून पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नाही. तसेच चोरी गेलेले दागिने सापडलेले नाहीत.

यापूर्वी ग्रामस्थांनी एकदा रास्तारोको आंदोलन केले होते. त्यावेळी संशयित आरोपी ताब्यात घेतल्याचे सांगून पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.

याला पंधरा दिवस होत आले असले तरी अजूनही खर्‍या चोराचा आणि दागिन्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे घोडेगाव ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलनाचा निर्धार केला आहे. निवेदन देताना ग्रामस्थांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24