अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील कारेगाव ते माळीचिंचोरा हा कालव्याजवळील बंद असलेला शिवरस्ता खुला होण्यासाठी रांजणगावदेवी या भागातील शेतकरी नारायण लक्ष्मण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दि.27 जानेवारीपासून वडाळा बहिरोबा येथील तलाठी कार्यालयाच्या समोर शेतकर्यांनी उपोषण सुरू केले आहे.
तत्पूर्वी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी नारायण चौधरी यांनी म्हटले आहे की, माझ्यासह रांजणगावदेवी येथील नऊ ते दहा शेतकर्यांनी मिळून 29 सप्टेंबर, 2020 रोजी कारेगाव ग्रामपंचायत समोर उपोषण केले होते.
त्यावेळेस त्याचदिवशी आम्हाला वडाळा बहिरोबा येथील मंडलाधिकारी व तलाठी यांनी लेखी आश्वासन देऊन पूर्व-पश्चिम गट क्रमांक 127 व 63 चे पैसे भरा व मोजणी करून घ्या.
त्यानुसार आम्ही चार शेतकर्यांनी 50 हजार रुपये मोजणी फी भरली मोजणी झाली खुणा देखील करून दिल्या. मात्र त्या शिवाजवळ कालवा आहे. कालवा व शिवरस्त्यामधील अंतर 25 ते 30 फूट अंतराचे आहे.
त्यामुळे इतक्या उंचीवरून ऊस वाहतूक करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकर्यांना कालव्याजवळ पूर्व-पश्चिम या दोन्ही बाजूने रस्ता द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. परंतु, अद्यापही दखल न घेतल्याने चीड व्यक्त केली जात आहे.
शेतकरी नारायण चौधरी यांच्या समवेत दीपक अंबाडे, जितेंद्र अंबाडे, लक्ष्मण चौधरी, आसाराम चौधरी, गोरक्षनाथ वाळुंजकर, हनुमंत वाळुंजकर शेतकरी उपोषणास बसलेले आहेत.