Ahmednagar News : भरधाव कारचा मृत्यूचा थरार ! अनेकांना उडवत गेली, एक ठार बाकीचे गंभीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आता हिट अँड रनचा थरार अहमदनगर मधून समोर आला आहे. एका एक्सयूव्ही कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिघांना उडवले आहे. यात एक ठार झाला असून दोघे गंभीर असल्याचे वृत्त आहे.

हा थरार श्रीरामपूरमध्ये घडला. ऐन सणासुदीला मकरसंक्रांतीच्या दिवशी एक्सयूव्ही कार चालकाच्या बेजबाबदार गाडी चालविल्याने हा मृत्यूचा थरार घडला. दरम्यान तिघांना उडवणारा हा इसम पळून जाण्याच्या तयारीत असतानाच लोकांनी त्याला पकडले. अनिकेत एकनाथ कांबळे, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या चालकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : अनिकेत याने महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही गाडीने श्रीरामपूर शहरात महात्मा गांधी पुतळा बेलापूर रोड येथे स्वाती दत्तात्रय वाकचौरे व शशिकला चंद्रकांत रणदीवे यांना जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर गाडी चालक गाडी नेवाशाच्या दिशेने जोरात घेऊन निघून गेला.

पुढे ओव्हरब्रीजवळ गझल हॉटेलजवळ मोटार सायकलला जोराची धडक दिली. या गाडीवरील युनूस अब्दुल सय्यद (रा. अशोकनगर) गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्याच वेळी सय्यद यांचे आतेभाऊ तेथून जात होते. त्यांनी आपली गाडी थांबवून जखमीला मदत करण्यासाठी धावले.

त्यावेळी एक्सयूव्हीमधील वाहनचालक गाडी सोडून पळून जावू लागला असता तेथे जमलेल्या लोकांनी त्यास पकडले. जखमी युनूस अब्दुल सय्यद यास साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याप्रकरणी मृत युनूस सय्यद यांच्या आतेभाऊ अनिस मलंग शाह यांनी फिर्याद दिली असून आरोपी चालक अनिकेत एकनाथ कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मागील काहीदिवसांत अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. यात काही मृत्यूही झाले आहेत. वाहनचालकांचा बेजबाबदारपणा, रस्त्यांची दुरवस्था आदी काही कारणे अपघाताला कारणीभूत असतात.