२५ जानेवारी २०२५ मिरजगाव : या एसटी बसमध्ये १५ ते २० प्रवासी असल्याने बसचे चालक एस. एस. टोपणधारे व वाहक सांगवे यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.बसचे मोठे नुकसान झाले आहे.एसटी बस नाशिक येथून सकाळी ६ वाजता निघाली होती.अहिल्यानगर येथून मिरजगाव बसस्थानकात ही बस आली तेव्हा बस सुस्थितीत होती.मात्र बसस्थानकापासून ही बस निघाल्यानंतर अवघे काही मीटर अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे बसने पेट घेतला.
बसला अचानक आग लागल्याने वेळीच बसमधून प्रवाशी बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ नाही या म्हणीचा प्रत्यय आला. मात्र, एसटी बस जळून खाक झाली आहे. मिरजगाव शहराच्या मध्यवर्ती कायम रहदारीच्या चौकात ही घटना घडल्याने भीषण पेटलेल्या बसने आगीचे रौद्ररूप धारण केले.
त्यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते.बस पेटल्याने परिसरातील दुकानदारांनी आपली दुकाने काही वेळ बंद ठेवून बाजूला गेले होते.या घटनेमुळे जुन्या महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक बराच वेळ ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
एसटी बसमधील काही प्रवाशांच्या जवळ साहित्य असलेल्या बॅगा व पिशव्या जळून खाक झाल्या.एसटी बस पेटल्याने कर्जत येथे असलेल्या अग्नीशामक वाहन बोलावण्यासाठी अनेक नागरिकांनी संपर्क केला. कर्जत येथून अग्निशामक वाहन आले. आग विझवली खरी, मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.
बसचा सांगाडाच त्या ठिकाणी राहिला होता.द बर्निंग बसची घटना पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.घटनास्थळी परिवहन महामंडळाचे अधिकारी विभागीय यांत्रिकी अभियंता कासार, विभागीय वाहतूक अधिकारी आर. डी. मगर, जामखेडचे आगार व्यवस्थापक जगताप, मिरजगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक निरंजन काळे आदी आले होते.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे जुन्या नगर, सोलापूर महामार्गावर येथील क्रांती चौकात दक्षिणमुखी मारूती मंदिर जवळ नाशिकहून आलेल्या व सोलापूर कडे जात असलेल्या नाशिक, सोलापूर बस क्र. एम. एच. १४ बी. टी. ४९५२ या एसटी बसने आज शुक्रवारी दुपारी १२ च्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे धुर निघाल्याने बस चालकाच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागून पेट घेतल्याची घटना घडली आहे.