अहमदनगर- संभाजीनगर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’चा थरार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर- संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव शिवारातील पागिरे पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी पाच वाजता ‘द बर्निंग ट्रक’चा थरार पहावयास मिळाला. सोनई पोलीस ठाण्याचे पथक बंदोबस्ताकामी जवळच असल्याने व जवळच्या पेट्रोल पंपावरील अग्निशमन बंब उपयोगी पडल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबत सूत्रांकडून समजले, की अहमदनगरकडून रायपुरकडे कांदा घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच १६ सीसी ७६७९ च्या टायरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याच्या घटनेने महामार्गावर खळबळ पसरली होती.

सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी व पथक बंदोबस्त कामी महामार्गावर असताना त्यांनी हा पेटलेला ट्रक पाहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ट्रक महामार्गावरून मोकळ्या परिसरात उभा करून चालकास खाली उतरवले.

जवळच्या पेट्रोल पंपावरून आग प्रतिबंधक बंब पोलीस कर्मचाऱ्यामार्फत आणून स्वतः बंब हातात घेऊन आग विझवली. याकामी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल पालवे व सुनिल ढोले यांनी आग विझवण्यास मदत केली.

महामार्गावर थोड्या कालावधी करता वाहतूक विस्कळीत होऊन घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या प्रकाराने पोलीस अधिकारी चौधरी यांनी केलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe