Ahmednagar News : अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जंगल जाळण्याची एक प्रथा पाहावयास मिळते. गुढीपाडव्याच्या अगोदर चार-दोन दिवस असे प्रकार केले जातात.
यावर्षीही अशा अनके घटना अकोलेत घडलेल्या आहेत. यामध्ये कान्हा, सुतारी, घोडी, ढग्या, कळंबदरा, लग्न्या, मोग्रस, पांगरी, नाचणठाव, करंडीची वारंगी आदी डोंगरे व त्यावरील वन संपदा जाळून खाक केली आहे.
यात हजारो वृक्ष आणि जिवांचा मृत्यू झाला आहे. परंतु असले प्रकार कोण करत असतात? यामागे कुणाचा काय हेतू आहे? खरोखर ही परंपरा चांगली आहे का? की यामागे काही स्वार्थी हेतू आहेत का? आदी गोष्टी पाहणे गरजेचे आहे.
जंगल जाळण्यामागे स्वार्थी गोष्टी?
शिकारी करणाऱ्या लोकांच्या जिथे वस्त्या आहेत, तिथले जंगल जाळले जाते. एप्रिल-मे दरम्यान मोर या जंगलात अंडी घालतात. जंगल जाळले की मोर खासगी क्षेत्रात येतात, त्यांची शिकार करणे सोपे होते असा एक निष्कर्ष निघतो. जंगल जाळले की ससे, घोरपडी, पक्षी, उद मांजर, खवले मांजर यांची सहज शिकार करता येते असेही म्हटले जाते.
त्याचप्रमाणे काही मीडिया रिपोर्टनुसार अकोलेत जंगल जाळणारे आणि शिकार करणारे काही संघटना आणि राजकीय पदे यांचा अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करतात. कधी-कधी अधिकाऱ्यांना बदलीची धमकी देतात. अनेक शिकारी लोकांकडे मोर मारण्यासाठी तीव्र प्रकाशझोताच्या बॅटरी तर काही लोकांकडे ठासणीच्या बंदुका आणि जिलेटीन स्फोटके असल्याचे बोलले जात आहे.
ढग्या डोंगराला सोमवारी आग, माहिती देणाऱ्यास बक्षीस
अकोले तालुक्यातील प्रसिद्ध ढग्या डोंगराला चोहोबाजूंनी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून अनेक शेकडो झाडी, जीवजंतू जळून खाक झाले. पहाटे घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कड्याकपारीत आग पसरल्याने हा वणवा आटोक्यात आणताना मेहनत घ्यावी लागली.
मंगळवारी पहाटेच्या दरम्यान धामणगाव आवारी, ढगेवाडी, वाशेरे या भागाला लागून असलेल्या ढगेवाडी डोंगराला सोमवारी (दि. ८) मोठी आग लागली. या आगीचा भडका इतका मोठा होता की, डोंगरावरील कड्या कपारीवरून आगीचे लोळ खाली पडत होते. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृक्षप्रेमींनी या वणव्यात जळणाऱ्या वनस्पती, झाडी पाहून हळहळ व्यक्त केली.
बक्षीस जाहीर
वणव्याबाबत अकोले प्रादेशिक वनविभागाने सूचना जारी केल्या आहेत. वणवा लावल्यास भारतीय वनअधिनियम १९२७ नुसार २ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड होईल. अकोले वनविभागातर्फे आग लावणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्यात येणार असून नाव सांगणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेच यंदा जाहीर करण्यात आले आहे.