अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- ट्रकचालक व मालकाने ट्रकमधील सोयाबीनची परस्पर विक्री करून एका व्यापाऱ्याला चक्क १३लाखांना चुना लावल्याची घटना नेवासा तालुक्यात घडला आहे.
याबाबत व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित अनिल गुंदेचा असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गुंदेचा यांची माळीचिंचोरा फाटा येथे आडत आहे. दोन दिवसांपूर्वी गुरुदत्त ट्रान्सपोर्ट अहमदनगर यांचे मालक पोपट रामभाऊ कोलते
(रा. अहमदनगर) यांच्या मालट्रकमध्ये (एमएच १८ बीजी ६९९४) २२ टन ४७० किलो वजनाच्या सोयाबीनच्या ४२६ बॅगा ( १४ लाख ८८ हजार ६६७ रुपये) भरुन हा मालट्रक दिशान ऍग्रो धुळे येथे रवाना केला.
तेव्हा या ट्रकवर चालक प्रसाद संतोष कराडे, ज्ञानेश्वर संतोष कराडे व ट्रकमालक संतोष बारकू कराडे हे होते. ९ जानेवारीला सोयाबीन बॅगा पोहचल्या की नाही याबाबत मालट्रकच्या मालकाकडे फोनवरुन चौकशी केली असता माल पोहचला नाही.
ट्रक दुरुस्तीचे काम मनमाड येथे चालू असल्याचे सांगण्यात आले. १० तारखेला ट्रकमालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा ट्रान्सपोर्टचे मालक पोपट रामभाऊ कोलते यांना घेऊन मनमाड येथे ट्रकलमालक संतोष कराडे याच्या घरी गेलो, तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
११ जानेवारी रोजी दुपारी १२च्या सुमारास जीपीएस प्रणालीद्वारे मालट्रक मनमाड शिवारात उभा असल्याची माहिती मिळाली. तेथे चालक ज्ञानेश्वर संतोष कराडे हा ट्रकसह मिळून आला.
ट्रकमध्ये केवळ सोयाबीनच्या ३० बॅगा शिल्लक राहिलेल्या होत्या. उर्वरीत सुमारे २० टन वजनाच्या १३ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या ३९६ सोयाबीन बॅगांची त्यांनी परस्पर विल्हेवाट लावली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मनमाड येथून चार आरोपींना अटक केली आहे.